जनतेज न्युज

बुलडाण्यातील अर्धवट बांधलेलं नाट्यगृह झालंय अवैध धंद्याचा अड्डा,२३ वर्षांपासून अजूनही बांधकाम अपूर्णच

प्रतिनिधी , बुलडाणा: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच साहित्य, नाट्य, सांस्कृतिक कलावंतांची संस्कृत देखील या मायभूमीला लाभली आहे. ही कला अजूनही रसिक आपल्या मनात जपत आहेत. नट कलावंतांचे कलागुण जोपासले जावेत, यासाठी नाट्यगृहांची निर्मिती केली जाते.मात्र, बुलडाण्यामध्ये गेल्या २३ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नाट्यगृहाचे बांधकाम अजून अपूर्णच असल्याने हेच अर्धवट नाट्यगृह आता नाटकांऐवजी जुगार, देहविक्री व्यवसाय, दारूचे पेग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. गेल्या २३ वर्षांपासून या नाट्यगृहांच्या प्रती अधिकाऱ्यांसह राजकीय मंडळींची अनास्था पाहायला मिळत आहे.
कलाकारातील सुप्त कलागुण अजून दृढ व्हावेत, यासाठी १९९५ – ९६ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ज्या जिल्ह्यात नाट्यगृह नाहीत, त्या जिल्ह्यामध्ये २ कोटी रुपये देऊन नाट्यगृह निर्मित करण्याचे ठरविण्यात आले, त्यानुसार बुलडाणा नगर पालिकेने जागा उपलब्ध करून दिली आणि १९९६ मध्ये मंजुरात मिळालेल्या ३५० आसन क्षमता असलेल्या नाट्यगृहांचे मार्च १९९७ मध्ये सत्तेत आलेले आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुनील देवतळे यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले आर. आर. पाटील यांनी भूमिपूजन केले, तेव्हापासून बांधकामात अनियमितता आणि साहित्याच्या वाढत्या किमती पाहता बांधकामाला निधींचा अडसर येऊ लागला, निधीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे काही जाणकार सांगतात. त्याचाच परिणाम म्हणजे दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटूनही हे नाट्यगृह अजून कलावंताच्या कलांची वाट पाहत आहे.