प्रतिनिधी, नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईकांनी काहि दिवसांपूर्वी ऐरोली मधील पुनरबांधणी प्रकल्पवरून शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यावर टीका करत त्यांचा डॉन असा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता. यावर शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत एखादा व्यक्ती काही बोलला म्हणून त्यावरून वातावरण बिघडत नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी युतीमध्ये स्थानिक निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे सांगितले असून ज्यांना हे मान्य नसेल ज्यांना युतीचा धर्म पाळायचा नसेल त्यांना पक्ष सोडावा लागेल, अशी रोखठोक भूमिका मांडली आहे. समजूतदारपणा दाखवावा लागतो, राजकारणात इमॅच्युअर वागून चालत नाही आणि युतीचा निर्णय वरचे लोक करत असतात. यांच्या हातात काही नाही असा टोला लगावत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया विजय नाहटा यांनी व्यक्त केली आहे.
