प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सीना-भोगावती नद्यांना पूर आल्याने मलिकपेठ येथील जुना बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.गेल्या 4 ऑगस्ट रोजी सीना नदीला पूर आल्याने येथील बंधारा पाण्याखाली गेला होता.
सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक भागातील ओढे-नाले ओसंडून वाहत आहेत.सीना आणि भोगावती नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून यामध्ये उडीद, सोयाबीन, मका व इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने नदी काठी असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या पाणी उपसण्याच्या मोटारी पाण्याखाली जावून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आधीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नसताना या नद्यांना दुसर्यांदा पूर आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.प्रशासनाने पुराच्या पाण्यामुळे झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
