प्रतिनिधी, बुलढाणा : चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत आरोपीकडून पाच लाख रुपये किमतीच्या गांजासह ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बेलाड फाट्यानजीक केली. गोपाल आनंदकुमार जयस्वाल (४३) रा. कालीकुर्ती, जालना हा एमएच-१३, एसी- १६०७ या चारचाकी गाडीने जळगाव खानदेशातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुरहा काकोडा येथून धाडकडे जात होता. त्याच्याकडे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा नामक अंमली पदार्थ असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहन थांबले नाही. त्यामुळे काही अंतरावर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करीत वाहन थांबविले. पोलिसांनी वाहनचालक गोपाल जयस्वाल याची चौकशी केली. तसेच झडती घेतली असता वाहनात १२ हजार रुपये प्रति किलोचा ४२ किलो २४० ग्रॅम, किंमत ५ लाख ६ हजार ८८० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. आरोपीला वाहनांसह ताब्यात घेतले. ही कारवाई डीबी पथकाचे सपोनि सुखदेव भोरकडे, इश्वर वाघ, संतोष कुमावत, प्रमोद राठोड, आसिफ शेख, अनिल डागोर, सलीम बर्डे सहभागी झाले. या कार्यवाहीत पोलिसांनी गांजासह २ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन मिळून एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
