प्रतिनिधी , धुळे : राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर करून तिघाडी सरकार सत्तेत आले आहे. वर्षभरात हे सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर आरोप करून त्यांच्या चुका झाकण्याचे काम करत असल्याची टीका भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी आज धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील महाआघाडी सरकारने नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त त्यांची पत्रकार परिषद झाली यावेळी भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी म्हणाले की , तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अनेक चांगले उपक्रम राबवण्यात आले. ते मोडीत काढण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने सुरू केला आहे. कोरोनच्या काळात अनेक घोटाळे या तीघाडी सरकारने केले आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेवर अत्याचार झाले असल्याचा आरोप देखील लक्ष्मण सावजी यांनी केला.
प्रवेशअर्जावरून हिंदू शब्द गायब
शाळांविषयी धोरण नाही. प्रवेशासाठी जो अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेतला जात आहे. त्यात मायनॉरिटी या कॉलम मध्ये हिंदू ऐवजी नॉन मायनॉरिटी असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर हे तीघाडी सरकारला नेमके काय बिंबावण्याचा प्रयत्न करीत आहे हा प्रश्न आहे. विधान परिषदेच्या सहाही जागांवर भाजपला विजय प्राप्त होईल, असा विश्वास लक्ष्मण सावजी यांनी व्यक्त केला.
