जनतेज न्युज

रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई हातगाड्यावर तोडक कारवाई

प्रतिनिधी , ठाणे : मिरारोड मिरारोडच्या नयानगर परिसरात रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. या फेरीवाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे बुधवारी पालिकेने फेरीवाल्यांच्या हातगाड्या रस्त्यावरच जेसीबीच्या साहाय्याने तोडत कारवाई केली आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात करोडो रुपये खर्च करुन सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहेत. बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गॅरेजची वाहने तर काही ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहने पार्किंग केली जातात. मिरारोडच्या नयानगर भागात तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर फेरीवाल्यानी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली होती.
फेरीवाले हे हातगाड्या लावून धंदा करत आहेत. भाजीपाला, फळे व कपडे आणि इतर वस्तू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात असून अनेक जण मास्क ही घालत नसल्याचे दिसून येते. हा रस्ता फेरीवाल्याना आंदण दिला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अनेक नागरिक हे फेरीवाल्याकडे भाजीपाला, फळे घेण्यासाठी गर्दी करत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. फेरीवाल्याबरोबर राजकीय व पालिकेच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे त्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच फेरीवाले हे बिनधास्तपणे रस्त्यावर बसून अतिक्रमण करत आहेत.
फेरीवाल्यावर कारवाई केली जाते परंतु दोन चार दिवसानंतर आहे तीच परिस्थिती निर्माण होते व पुन्हा कारवाई केली जात नाही. बुधवारी पालिकेकडून फेरीवाल्याच्या हातगाड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना आयुक्त डॉ. विजय राठोड व अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजित मुठे, प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे तसेच सर्व प्रभागाचे प्रभाग अधिकारी, पोलीस बंदोबस्तात जवळपास २०० हातगाड्या जागेवरच तोडून कारवाई करण्यात आली.