जनतेज न्युज

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ रक्षक ‘ डिव्हाईस सांगलीतील प्राध्यापकाचे संशोधन : अत्याचाराला बसणार आळा

प्रतिनिधी , सांगली: शिक्षण – नोकरीच्या निमित्ताने विद्यार्थीनी किंव्हा महिलाना एकट्याला प्रवास करावा लागतो . या संधीचा गैरफायदा घेऊन काही नराधम त्यांचा पाठलाग करणे छेडछाड करणे, त्यांच्यावर अत्याचार करणेअसे प्रकार करीत आहेत. अशा घटना घडत असताना त्याची माहिती तातडीने पोलिसांपर्यंत आणि कुटुंबापर्यंत पोहोचावी आणि त्यांचे रक्षण व्हावे यासाठी सांगलीतील प्राध्यापकाने ‘रक्षक’ नावाचे डिव्हाईस तयार केले आहे . पोलिसांच्या सहकार्याने हे डिव्हाईस महिला आणि मुलींना देण्यात येणार आहे . प्रा. आरिफ अमीन शेख यांनी रक्षक नावच डिव्हाईस बनवलं आहे. यापूर्वी त्यांनी कोरोना काळात रुग्णांची काळजी घेणारा ‘ रोबोट ‘ तयार केला होता.
‘ रक्षक ‘ या डिव्हाईसमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या या डिव्हाईसमध्ये ‘ अत्याधुनिक कंट्रोल सिस्टीम वापरण्यात आली आहे . महिलांनी हे डिव्हाईस घेतल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक जवळच्या पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकाकडे रजिस्टर करावा लागतो . त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून डिव्हाईस कनेक्ट होऊ शकते . यात दोन मोड असून , एक मोड पोलिसांकडील दामिनी पथकाला आणि दुसरा मोड पालकांच्या मोबाईलला जोडता येतो . बसमध्ये , अज्ञात ठिकाणी कोणी छेडछाड करीत असेल , बलात्काराचा प्रयत्न करीत असेल , मारहाण करीत असेल अशावेळी या डिव्हाईसचा केवळ स्वीच ऑन केल्यास इंटरनेटच्या माध्यमातून जवळच्या पोलिस ठाण्याला दर ५ ते १० सेकंदांनी सिग्नल जात या सिग्नलच्या माध्यमातून पोलिस ती महिला , मुलीकडील डिव्हाईसवरून जीपीएस यंत्रणेद्वारे लोकेशन करून घटनेच्या ठिकाणी तत्काळ पोहोचू शकतात . त्यामुळे होणारा गैरप्रकार टाळून महिलांचे , मुलींचे रक्षण होऊ शकते.अथवा कॉलेजला गेलेली मुलगी अडचणीत सापडली असेल तर यातील एक मोडद्वारे पालकांनाही सिग्नल जाऊ शकतो . त्यामुळे पालक तातडीने पोलिसांशी संपर्क साधू शकतात . या डिव्हाईसची चाचणी सांगलीच्या दामिनी पथकाद्वारे केली जात आहे . त्यानंतर पोलिसांच्या सहकार्यान नोकरी करणाऱ्या , एकट्या राहणाऱ्या महिलांना डिव्हाईस दिले जाणार आहे.