जनतेज न्युज

मायाक्कादेवी यात्रे निमित्त बंधूनगरी आरेवाडीकरांचा आहेर माहेरासह नैवद्याचा आज मान

प्रतिनिधी, सांगली : भारतीय संस्कृतीमध्ये यात्रा, सण समारंभ व उत्सव याला एक वेगळे स्थान आहे. काबाडकष्ट करणाऱ्या समाज घटकांच्या जीवनातील एक आनंदाचा,  विरंगुळ्याचा, भेटीगाठीचा आणि वैचारिक देवाणघेवाणीचा क्षण म्हणजे या यात्रा होय. त्यातीलच एक यात्रा म्हणजे कर्नाटकातील मायाक्कादेवी यात्रा चिंचणी होय. ही यात्रा माघ महिन्यातील पौर्णिमेपासून ५ दिवस भरत असते. या यात्रेसाठी पूर्वी प्रामुख्याने बैलगाडीने प्रवास केला जात असत. आजही काही भागातील भाविक बैलगाडीने चिंचणीच्या यात्रेला जात असतात. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बैलगाड्या घेवून भक्त जात असतात. आधुनिक काळात बैलगाडीने यात्रेला जाणे, हे एक वेगळा आनंद देणारा प्रवास आणि अनुभव असतो. ५-६ दिवसांचा संपूर्ण प्रवास, १०-२० बैलगाड्यांचा समूह मुक्काम, मुक्कामी ठिकाणी जेवण बनविणे, खाणे व पुढील प्रवास हा अनोखा अनुभव वर्षातून एकदा मिळत असतो.

आज माघी पौर्णिमेचा चौथा दिवस म्हणजे बंधूनगरी आरेवाडीचा मानाच्या नैवद्याचा दिवस. या दिवसाच्या आदल्या दिवशी आरेवाडी गावातील शेकडो भक्त भाविक पायी, बैलगाडीने व मोटारगाडीने पोहोचतात. आणि आजच्या मानाच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीमध्ये स्नान करून पाणी आणतात. त्या पाण्याने पुरणपोळीचा नैवेद्य करून बहीण आक्का मायवाला माहेरचा आहेर करून मनोभावे पूजा करतात. गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही बहिण भावाच्या नात्याची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे.त्यानंतर पौर्णिमेच्या पाचव्या दिवशी इतर सर्व भाविकांचा नैवद्य असतो. या दिवशी चिंचणी नगरी भाविकांनी फुलून जाते. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातून लाखो भाविक यात्रेला येतात. हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडते. ढोल कैताळाचा निनाद, म्हाकुबाईच्या नावानं चांगभलं चा गजर आणि भंडाऱ्याची उधळण, अशा भक्तीमय वातावरणात यात्रा पार पडते. त्यानंतर सकाळी पालखी मंदिरात स्थानापन्न होते आणि त्यानंतर भाविक भक्तांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते.