जनतेज न्युज

मुंबईचा डबेवाला संघटनेचे माजी प्रवक्ते सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.

प्रतिनिधी , पुणे , मुंबईचा डबेवाला संघटनेचे माजी प्रवक्ते सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. सुभाष तळेकर याच्यावर मुंबईच्या डबेवाल्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नवी मुंबईतील एका पतपेढी संस्थेच्या मदतीने मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत टीव्हीएस मोपेड ही दुचाकी देणार असल्याचं सांगून सुभाष तळेकर याने साठ डबेवाला कडून त्यांची कागदपत्रे गोळा केली होती. त्यानुसार काही डबेवाल्यांना दुचाकी मिळाल्या खऱ्या परंतु त्यांना आरटीओचा परवाना नव्हता सोबतच अनेक डबेवाल्यांना दुचाकी तर मिळाली नाहीच परंतु त्यांच्या खात्यातून पैसेदेखील वजा व्हायला सुरुवात झाली. तसेच काही डबेवाल्यांना कर्ज फेडण्यासाठी पतपेढी करून फोन देखील येऊ लागले. आपली फसवणूक झाल्याचं कळतात काही डबेवाल्यांनी 4 फेब्रुवारी 2019 रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात सुभाष तळेकर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी अखेर सुभाष तळेकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सुभाष तळेकर याच्या व्यतिरिक्त डबेवाला असोसिएशनचे माजी सेक्रेटरी विठ्ठल सावंत , सदस्य दशरथ केदारे , साई इंटरप्राईजेस चे राकेश प्रसाद आणि भावेश दोषी यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला असून पुढील तपास घाटकोपर पोलिस करत आहेत.