जनतेज न्युज

अचानक कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरात कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात घातला गोंधळ.

प्रतिनिधि , कोल्हापूर : अचानक कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरातील सुभद्रा लोकल एरिया बँक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात गोंधळ घातला आहे. जोपर्यंत नोटीस परत घेतली जात नाही तोपर्यंत बँक उघडू देणार नाही, अशी भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी बँक व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले.

२४ डिसेंबर रोजी भारतीय रिझर्व बँकेने सुभद्रा लोकल एरिया बँक कोल्हापूर शाखेचा परवाना रद्द केला आहे. यामुळे बँकेवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, सोमवार ४ जानेवारी रोजी बँकेतील जवळपास 30 हून अधिक कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीस बजावण्यात आली.
त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

तीन महिन्याचा पगार घेऊन कामावरून कमी व्हा, असे आदेश त्यामध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. बँकेवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू असताना मॅनेजमेंट व्यवस्थापकाने दिलेल्या नोटिसा आम्हाला मान्य नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी आज सर्वच कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात गोंधळ घातला आहे.