जनतेज न्युज

राज्य सरकार जाणून बुजून एस.टी कर्मचाऱ्यांना छळत आहे; महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचा आरोप

प्रतिनिधी , धुळे : कोविड – 19 च्या महामारीच्या काळात एसटी कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असतांना त्यांना मात्र तीन महिन्यांपासून वेतन नाही, वेतन नसल्यानं कर्मचारी हवालदिल झाले आहेत. परिणामी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.
ऐन दिवाळी तोंडावर आली असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास कामगार संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. कोरोना सारख्या महामारी देखील धुळे एस.टी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत मुंबई मध्ये जाऊन बेस्ट ला मदत केली आहे. मात्र राज्य सरकार जाणून बुजून एस.टी कर्मचाऱ्यांना छळत आहे असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.