प्रतिनिधी, जळगाव : बुधवारी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी सावखेडा, लोहारा, गौरखेडा, कुंभारखेडा, चिनावल परिसरात वादळी वाऱ्याने हजेरी लावून परिसराला तडाखा दिला. यात केळी बागा व सावखेडा परिसरातील गावांमध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले. त्यात सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायत जवळील सारंग देविदास पाटील व प्रल्हाद बाबूराव पाटील यांच्या घरावर सुमारे दीडशे वर्षे जुना वटवृक्ष कोसळला. त्याखाली नवीन ट्रॅक्टर दाबले गेले.
मे महिन्याच्या अखेरीस रावेर तालुक्यातील या परिसरात वादळी वाऱ्याने थैमान घालून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते. बुधवारी देखील मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसासोबत वादळी वाऱ्याने तडाखा देऊन शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. सावखेडा, गौरखेडा, लोहारा, कुंभारखेडा शिवारात केळी बागा उन्मळून पडल्या. सावखेडा परिसरात वादळाने अनेक झाडे उन्मळून पडली. वीज खांब, तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
