प्रतिनिधी , जालना : खामगाव रेल्वेमार्गाच्या कामाला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेची १०६ वर्षाची मागणी अखेर मंजूर झाली आहे. त्यासाठी र्लेवेची पाहणी समिती जिल्ह्यात दाखल झाली असून त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे. हा मार्ग साकार झाल्यानंतर बुलडाणा आणि जालना या मागा जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहेच शिवाय विदर्भ पंढरी शेगाव हे तीर्थक्षेत्र जोडलीले जाणार आहेत.
भौगोलिकदृष्ट्या बुलढाणा जिल्हा हा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. येथून मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी मार्ग आहेत. येथील भुसार माल, स्टील उद्योग यांचे महत्त्व लक्षात घेता जालना रेल्वेमार्गाने विदर्भाला जोडणे आवश्यक होते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून जालना-खामगाव मार्गासाठी नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली होती. यासाठी अर्थसंकल्पात या मार्गासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार जालना- खामगाव या रेल्वे मार्गाची पाहणीसाठी रेल्वेची एक समिती मागील दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली असून जिल्ह्यातील सीङ्कहाइड राजा, देऊळगाव राजा लोणार, चिखली आणि खामगाव तालुक्याला यासमितीने भेटी दिल्या नंतर आज शुक्रवारी हि समिती संत नागरी शेगावात दाखल झाली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार ऍड आकाश फुंडकर यांच्यासह समितीने रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी यामार्गामुळे जसा व्यापार आणि उद्योगाला लाभ होणार आहे त्याचप्रमाणे विदर्भाची पंढरी शेगाव आणि महाराष्ट्राची पंढरी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र थेट रेल्वे ट्रॅकने जोडली जाणार आहेत. हा मार्ग भाविकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शिवाय खामगाव मध्य रेल्वेला जोडलेले आहे तर जालना दक्षिण मध्य रेल्वेला जोडलेले आहे. त्यामुळे जालना-खामगाव मार्गासाठी रेल्वेच्या या दोन्ही विभागांना एकत्रित काम करावे लागणार आहे. हा मार्ग शेगाव पर्यंत व्हावा असे प्रयत्न आपण करीत असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
