प्रतिनिधी , वडीगोद्री : रेशीम कोषाचे घसरलेले दर व बाजारातील अनिश्चितता,रेशीम शेतीसाठी शासनाचे मिळणारे अनुदानही न मिळाल्याने अत्यंत कष्टाने पिकवलेले दोन एकरातील तुतीचे पीकही जेसिबीने उपटून टाकण्याची वेळ अंबड तालुक्यातील शेतकऱ्यावर आली असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील रेशीम उत्पादक शेतकरी चंद्रकांत खमीतकर यांनी अंतरवाली सराटी शिवारात गट नं १४० मध्ये २ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड दोन वर्षांपूर्वी केली होती.शेड उभारणीसाठी दोन लाख रुपये खर्च आला व तुती लागवड,मेहनत,मशागत व मजुरीचा असा दीड लाख रुपये खर्च झाला. पहिल्या वर्षी झाडे लहान असल्याने जेमतेमच उत्पन्न मिळाले.दुसऱ्या वर्षी तुतीचे झाडे जोमदार व बहारदार आली असतांना लाखो रुपयांच्या उत्पन्नाची मिळेल असे सुखकारक चित्र दिसत होते.मात्र या बहारदार पिकास कोरोना रुपी संकटाची दृष्ट लागली व सर्व अपेक्षा फोल ठरल्या.
मागील आठ महिन्यापासून बाजारात रेशीम कोषाचे दर घसरले. गेल्यावर्षी ५५० रुपये किलो दराने विकला जाणारा रेशीम कोषाचे दर या हंगामात १६० रुपये किलो निच्चांकी दराने विकला जातोय. त्यामुळे उत्पादन खर्च ही निघत नसल्याने व दोन वर्षात शासनाचे एक रूपयाचे अनुदानही नमिळल्याने उद्विग्नतेने तुतीचे पीक या शेतकऱ्याने काढून टाकले आहे.
मेहनतीने फुलवलेला तुतीचे झाडे काढून टाकावी लागली आहे. लागवडीसाठी दीड लाख, शेड उभारणीसाठी दोन लाख खर्च झाला. रेशीम शेती साठी शासनाकडून तीन लाख रुपये अनुदान देण्यात येते.सर्व कागदपत्रांची पूर्तता करून,अनुदानाचा प्रस्ताव ऑनलाइन करून दीड वर्ष झाले.रेशीम लागवडीची खातरजमा करण्यासाठी रेशीम विकास अधिकारी ही फिरकले नाही आणि अनुदान ही मिळाले नाही. यात त्यांना उत्पन्न तर शून्य झाले.पण ही तुतीची झाडे जेसिबी ने उपटून फेकण्यासाठी १० हजार रुपये खर्च करावा लागला आहे.
आधीच शेतकरी हा पुरता अस्मानी आणि सुलतानी संकटाने हैराण झाला आहे.कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद हा शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही.उत्पन्न जास्त झाले तर त्यांना योग्य भाव मिळत नाही.त्या शेतमालाची कवडीमोल दरात विक्री करावी लागते.त्यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलत नाही.
रेशीम लागवडीसाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते. रेशीम लागवडीसाठी गावोगावी रेशीम विभागाचा रथही फिरवला जातो.लाखो रुपये अनुदान देण्याचे आमिष दाखवले जाते. तशी जाहिरातबाजी ही केल्या जाते.त्यावर कोट्यवधींचा खर्च ही होतो. प्रत्यक्षात मात्र एक छदाम ही देत नसल्याचा अनुभव खमीतकर यांच्या सारख्या असंख्य शेतकऱ्यांना येत आहे.
रेशीम कोश उत्पादक शेतकऱ्यांना कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे रेशीम कोष मातीमोल किमतीत विक्री करावे लागले. कडक लॉकडाऊन काळात अंडीपुंज (रेशीम अळी) न मिळल्याने तीन महिने तुतीचा पाला कापून फेकून द्यावा लागला. रेशीम उत्पादक चंद्रकांत खमीतकर यांना जर अंडी पुंज मिळाले असते तर किमान ३ ते ४ क्विंटल रेशीम कोषाचे उत्पादन त्यांना मिळाले असते.परंतु या कडक लॉक डाऊनमुळे ही अंडी पुंज त्यांना मिळाली नाही.त्यामुळे त्यांचे सुमारे १ लाख २५ हजार ते २ लाखाचे नुकसान झाले होते.मोठे काबाडकष्ट करून त्यांनी ही रेशीम शेती फुलवली होती.
आता टाळेबंदी उठल्यानंतर रेशीम कोषाला मागणी घेतली व दर कोसळले त्यामुळे यात शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती ही इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली आहे.
