प्रतिनिधी , पुणे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना गुरुवारी सकाळी पुणे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यारस्त्यांवर योगा क्लास सुरू असल्याचे दिसून आले. हे काही नेहमीचे योगा क्लास नव्हते तर विनाकारण रस्त्यावर फिरणार्या आणि सकाळी फिरायला येणाऱ्यांना पकडून पोलिसांनी योगा करायला लावले होते.
शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अर्ध्या शहरात कर्फ्यू लागू करून परिसर सील करण्यात आला आहे. असे असतानाही असंख्य पुणेकरांना त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे या सर्वांना कायदेशीर कारवाई करण्याइतके पोलीस बळ अडकवून ठेवणेही पोलिसांना शक्य होत नाही. त्यावर पोलिसांनी एक नामी शक्कल लढविली. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी गुन्हे शाखेला आदेश दिला. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच गुन्हे शाखेची पथके आज पहाटेपासून रस्त्यावर उतरली होती. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी रस्त्यावर उतरलेल्यांना थांबविले. भररस्त्यात त्यांच्याकडून सूर्यनमस्कार, जागेवरच उड्या मारणे, उठाबशा काढणे असे विविध प्रकार त्यांच्याकडून करवून घेतले.
शहरातील हडपसर, चतु:श्रृंगी, बिबवेवाडी या परिसरात प्रामुख्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बिबवेवाडी येथे जवळपास ७० जणांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून भररस्त्यावर सूर्यनमस्कार घालण्यास भाग पाडण्यात आले. हडपसरमध्येही ५४ जणांना व्यायाम करायला लावला. शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारे कारवाई करून विनाकारण बाहेर पडणार्यांना चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.
