प्रतिनिधी, अहमदनगर :
शेवगाव शहरात तीन दिवसातून एकदा पूर्ण दाबाने सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीच्या पाठपुराव्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या शेवगाव शहर बंद आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी गुरुवारी आपआपले व्यवहार बंद ठेवून याबाबत संबधितांच्या कार्यपद्धतीबाबत निषेध नोंदवून पाणी समस्येबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. येथील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृवाखाली सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पाणी समस्येबाबत सहनशिलतेचा कडेलोट झालेल्या असंख्य ग्रामस्थांनी वाहतूक रोखून धरल्याने मुख्य रस्त्याच्या सर्व बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे ५० हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या शेवगाव शहरात गेल्या काही दिवसापासून पंधरादिवसातून एकदा व तोही दुषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने शहरवासियांना विशेषत: महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी अगदी लांब पर्यंत भटकंती करण्याची वेळ आली आहे. याबाबत संबधित विभागाला वारंवार निवेदन देवून तसेच जन आंदोलन करून या महत्वपूर्ण प्रश्नी वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी जोरदार पाठपुरावा केला आहे. तरीही पाणी समस्या कायम आहे.
वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, राजेंद्र नाईक, विशाल इंगळे, शेख सलीम जिलानी, विक्की मगर, हाजी महंमद हानिफ तांबोळी, सागर गरुड, नजीर शेख, पाथर्डीचे भोरू म्हस्के, लक्ष्मण मोरे, राजू इंगळे, रफिक शेख, जावेद कामियाब, अजय फुंदे, विष्णू वाघमारे, मोहसीन बुलेट, सौरभ काकडे, भारत मिसाळ, सागर हवाले, हाजी बाबाभाइ, रोहिणी ठोंबे, यांच्यासह वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी निवेदन स्वीकारून पाणी वितरण समस्येबाबत आंदोलकांशी संवाद साधला.
