जनतेज न्युज

वांद्रे येथे मजुरांची गर्दी जमण्याप्रकरणी पत्रकाराला करण्यात आलेली अटक संतापजनक – विनोद तावडे

प्रतिनिधी , मुंबई : वांद्रे येथे परप्रांतीय मजुरांची गर्दी जमण्याच्या प्रकरणी मराठी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराला करण्यात आलेली अटक हा संतापजनक प्रकार आहे. सरकारचा स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे.

मराठी वाहिनीच्या बातमीमुळे वांद्रे येथे गर्दी जमली, असे मानणे हास्यास्पद आहे. हे मुख्यमंत्री, सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र असू शकते याची सखोल चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

घरी परत जाण्यासाठी जमलेल्या या मजूर – कामगारांजवळ सामानाच्या पिशव्या नव्हत्या. यातील बहुसंख्य मजूर नाका कामगार आहेत. त्यांची संघटना कोणत्या डाव्या संघटनेशी संबंधित आहे. त्यांच्या संघटनेने याबाबत काही निर्देश दिले होते काय? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून फर्लांगभरावर एवढी गर्दी जमा होते आणि गुप्तचर खात्याला त्याची माहिती मिळत नाही हे सर्व अनाकलनीय आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तावडे यांनी केली.

पश्चिम विदर्भात, अमरावती विभागात कोरोनाची साथ पसरते आहे पण तिथे कोरोनाच्या चाचणीचे केंद्र नाही. सर्व नमुने नागपूरला पाठवले जातात. अमरावती किंवा यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या चाचणीची व्यवस्था करा, अशी मागणी त्यांनी केली.

सध्या कोरोनाच्या निवारणासाठी व लॉकडाऊनमध्ये गरजूना मदत देण्यासाठी निधी अपुरा पडतो आहे. पण, ३१ मार्चला कोरोनाचे संकट स्पष्ट दिवसात असताना जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांचे पैसे मात्र घाईने देण्यात आलेत, अशी टीका तावडे यांनी केली.

मंत्र्यांवर टीका केली म्हणून अमरावतीचे शिवराय व इतरांवर सरकार गुन्हे दाखल करते, हा विचार स्वातंत्र्याचा संकोच आहे, अशी टीका त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.