जनतेज न्युज

शरद पवारांनी घेतली कोरोनाविरोधी लस

प्रतिनिधी , मुंबई : भारतामध्ये तिसऱ्या टप्प्यातील कोरोनाविरोधी लसीकरण आजपासून सुरू झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीकरण करून घेतल्यानंतर, आता त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील कोरोना लसीकरण करून घेतले आहे.
शरद पवार यांनी आज दुपारी ३ च्या सुमारास मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतली आहे.सोशल मिडियाद्वारे लसीकरणाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी वयस्कर आणि पात्र मंडळींना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात सामील होण्याचे आवाहन सुद्धा पवार यांनी यावेळी केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रभर थैमान घालत असताना, इतर राज्यांना देखील त्याचा धोका जास्त प्रमाणात जाणवू लागला आहे. अशातच, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांसारख्या मोठ्या मंडळींनी लसीकरण करून घेऊन लोकांच्या मनातील भीती घालवत लसीकरणाचे आवाहन केले आहे.