जनतेज न्युज

शेतकऱ्यांनो आत्ताच पेरणीची घाई नको , कृषी विभागाचे आवाहन

प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांमध्ये पाऊस बरसला आणि याच पावसावर काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केलीय. मात्र झालेला पाऊस पुरेसा नसून केवळ 49 मिलिमीटर इतका झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत मान्सून जिल्ह्यात स्थिरावत नाही, तोपर्यंत पेरणीची घाई करु नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातील सावरगाव, मांडवा, बेलगांव, शेरी, कडा या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलीय. माञ मान्सूनच्या सुरुवातीलाच शेतकर्‍यांनी पेरणी केली आणि पावसाचा खंड पडला तर मात्र दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभा राहू शकतं अशी शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करणं चुकीचे असल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.