जनतेज न्युज

सणाच्या दिवशी कोणी रस्त्यात गोंधळ घातला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल – अमितेश कुमार

प्रतिनिधी, नागपूर : होळी आणि धुलिवंदनाचा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. राज्य सरकारने होळीचा सण साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. नागपूर पोलिसांना यंदा दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यंदा १५ वर्षांच्या कालावधीने होळी आणि मुस्लीम बांधवांचा शब्बे बारात एकाच दिवशी येणार असल्यामुळे शहरात कायदा -सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान नागपूर पोलिसांसमोर असणार आहे.या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शांतता समितीची बैठक घेतली.यावेळी शहरात कायदा -सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व घटकांनी मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या बैठकीला नागपूर पोलीस दलातील DCP,ACP आणि सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक हजर होते. तसेच या बैठकीला सर्वधर्मीय नेत्यांचीही उपस्थिती होती.फेब्रुवारी महिन्यात शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. फेब्रुवारीत नागपूर शहरामध्ये हत्येचा एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतू मार्च महिन्यात आतापर्यंत शहरात चार हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. होळी आणि शब्बे बारातचं निमीत्त साधून समाजातील काही विघातक वृत्ती यावेळी आपलं डोकं वर काढू शकतात. यावर तोडगा म्हणून आज बैठक घेण्यात आली होती.यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सणाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने रस्त्यात गोंधळ घातला तर त्याला थेट जेलमध्ये टाकलं जाईल असं सांगितलं आहे.