प्रतिनिधी, नंदुरबार : आदिवासी संस्कृती व ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या हॉलिकोस्तवाचे वेध आदिवासी बांधवाना लागले आहे .ढोल बासरी व बिरीचा आवाज आज सातपुड्याच्या कुशीत गुंजायला लागला आहे. आदिवासी बांधवांच्या राजवाडी होळी सह भोगऱ्या बाजाराची ख्याती सर्वांनाच भुरळ घालणारी आहे. सातपुड्यात गेल्या 15 दिवसापासून होळीचे वेध लागले असून स्थानिक जनते सह राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांची उत्सुकता वाढली आहे. दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे होळी सण साजरा होत नव्हता,त्यामुळे गावापाड्या कडे नागरिक ,नातलग आलेच नाही परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सातपुडा पर्वत रांगेतील प्रसिद्ध होलिकोत्सव सण हा केवळ आदिवासी समाजासाठीच नव्हे तर राज्यातील महानगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक उत्सुकता आणि आनंदाचा क्षण असतो , या सणाला मुंबई , पुणे सह गुजरात व मध्य प्रदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.
वर्षभर सातपुड्याच्या कुशीतील नागरिक रोजगार नोकरी तथा व्यवसायानिमित्त बाहेर असतो परंतु होळीसाठी गावी येण्याला प्रथम प्राधान्य ते देतात . रोजगारासाठी स्थलांतर केलेले मंजूर गावात दाखल झाले आहेत .नोकरवर्ग ही आपल्या कुटुंबासह होळीसाठी आठवडाभराची सुट्टी घेऊन गावाकडे येऊ लागला आहे. होळी निमित्त पुनर्वसन वसाहतीत स्पर्धांची धूम असणार आहे .यात विविध प्रकारचे नृत्य पहावयास मिळतात त्यामुळे होळी सणाची रंगत वाढणार आहे. त्यादृष्टीने गावातील नागरिकांचे नियोजन व तयारी सुरू आहे. होळीनिमित्त आदिवासी बांधवचे खास पोशाख परिधान केलेले पारंपरिक समूहनृत्य पाहण्यास मिळणार आहे. डाब येथील राजवाडी होळीला प्रथम मान दिला जातो .डाब येथील आदिवासी कुलदेवता याहामोगी मातेचे ,राजा फाटा गाठा ठाकूर नावाने डाब हे गाव ओळखले जाते, त्यामुळे सातपुड्यातील पहिला होळीच्या मान त्यांना दिला जातो .त्यानंतर इतर ठिकाणी होळीला सुरुवात होते. गोरंबा काकडपाटी, खाबला कालीबेल, खुंटा ,काठीसंस्थान अशा विविध ठिकाणी होलिकोत्सव साजरा केला जातो. आपल्या विविध पोशाख व विविध नृत्य कलेने आदिवासी संस्कृती घडवणारा होलिकोत्सवाला सुरुवात झाली असून सातपुडा पर्वत रांगांमध्ये होळीचे ढोल निनादू लागले आहेत…..
