जनतेज न्युज

सांगलीच्या सरकारी घाटावर स्वच्छता मोहीम: 1 टन कचरा केला गोळा: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने मोहीम

प्रतिनिधी , सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर महापालिका आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवित घाटाच्या परिसरातून 1 टन कचरा गोळा केला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही मोहीम राबविण्यात आली.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात सध्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 साठी जोरदार तयारी आहे. या अंतर्गत सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी आणि स्वामी समर्थ घाटाच्या परीसराची स्वच्छता करून घेणेचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी
आरोग्य यंत्रणेला दिले होते. या नुसार आरोग्य विभागाकडून सरकारी आणि स्वामी समर्थ घाटांची स्वच्छता करीत महापालिका कर्मचाऱ्यांनी या परिसरातून 1 टन कचरा गोळा केला आहे.
याचबरोबर मोकळ्या प्लास्टिक पिशव्याही स्वच्छता कर्मचाऱ्यानी गोळा केल्या आहेत. सरकारी घाटावर येणाऱ्या नागरिकांनी आपल्या सोबतच कचरा त्याच ठिकाणी न टाकता तो महापालिकेच्या कचरा पेटीत टाकावा आणि घाटाचे पावित्र्य राखावे असे आवाहन स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने यांनी केले आहे. या स्वच्छता मोहिमेत मुकादम अमित शिंदे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते.