साक्री तालुक्यातील निजामपूर गावाजवळ ट्रक आणि एसटी बसची समोरा समोर धडक झाल्याने एकजण जागीच ठार झाला आहे तर बसमधील १५ ते २० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्रतिनिधी , नंदुरबार : निजामपूरहुन नंदुरबार कडे जाणारी बसने नंदुरबार कडून निजामपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला समोरून धडक दिल्याने एसटी बसच्या कॅबिनचा पूर्णता चेंदामेंदा झाला आहे तर बस मधील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच निजामपुर-जैताने येथील ग्रामस्थांसह पोलिस प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले व जखमींना तात्काळ नंदुरबार व धुळे येथे उपचारासाठी पाठविले. रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला अशी चर्चा सुरू होती. अपघात इतका भीषण होता की एसटी बस मध्ये अडकलेल्या बस चालकास काढण्यासाठी गॅस कटर चा उपयोग करावा लागला. अपघाता नंतर रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तासांनंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.
