प्रतिनिधी , सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतींच्या निवडीत पुन्हा पेच निर्माण झालाय.
गटनेते पदाच्या वादातून थेट स्थायी समिती आणि परिवहन समितीच निलंबित केलीय. एमआयएमचा गटनेता कोण या वादातून मागील आठवड्यात निवडणूक प्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली होती. मात्र कोर्टाच्या आदेशामुळे आज ही प्रक्रिया पार पडणार होती. आज निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शासनाने संपूर्ण स्थायी समिती आणि परिवहन समितीच निलंबित केली. त्यामुळे आज होणारी निवडणूक प्रक्रिया देखील रद्द करावी लागली आहे. स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्यांची निवड ही महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 31-अ तरतुदींशी विसगंत असल्याने अधिनियमाच्या कलम 451 (1) अन्वये सदरील ठराव निलंबित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तसेच संबंधिताना हरकती नोंदविण्यासाठी 30 दिवसांची मुदत देखील देण्यात आली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला विकासापासून रोखण्याचे काम केले आहे. असा आरोप भाजपचे पक्षनेते श्रीनिवास करली यांनी केला.
यावेळी स्थायी समिती सभापती आणि परिवहन समिती सभापती यांच्यासाठी फुलांनी सजवण्यात आलेल्या गाड्या मात्र रिकामीच राहिल्याचं चित्र पहायला मिळालं.
