जनतेज न्युज

हक्काच्या सातबारा साठी 80 किलोमीटरची पायपीट करीत आदिवासी शेतकरी पोहोचले धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर..

प्रतिनिधी, धुळे : वनजमिनी कसणाऱ्या आदिवासी बांधवांना शासनाने सातबारा उतारा द्यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून निघालेला आदिवासी बांधवांचा मोर्चा आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

वनजमिनी आदिवासींच्या नावावर करण्याचा कायदा गेली 14 वर्ष होऊन देखील अद्याप या कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने आदिवासी बांधवांना आपल्या वनजमिनींचा सातबारा उतारा अद्याप मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर वन जमिनी कसणाऱ्या आदिवासी बांधवांना सातबारा उतारा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून रविवारी मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती आज हा मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात हजारो आदिवासी बांधव आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सहभागी झाले होते.

शहराच्या विविध भागातून मार्गस्थ झालेला हा मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आला. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील क्यूमाईन क्लब येथे मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटणार असल्याची माहिती हिरालाल परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.