जनतेज न्युज

हर्षल संतचे जळगाव मध्ये जोरदार स्वागत

प्रतिनिधी , जळगाव : मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी हर्षल संत हिने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर झालेल्या एनसीसीच्या संचलनात देशाचे नेतृत्व केले होते. ‘ऑल इंडिया परेड कमांडर’ म्हणून तिने पद भूषवले होते. समृद्धी व तिचे कुटुंबीय आज (शनिवारी) दिल्लीहून जळगावात परतले. जळगावकरांनी समृद्धी व तिच्या कुटुंबीयांचे जल्लोषात स्वागत केले. शहरवासीयांच्या प्रेमाने संत कुटुंबीय भारावले होते.
26 जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. या परेडमध्ये सहभागी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. या परेडमध्ये सहभागी होण्याचा बहुमान जळगावच्या समृद्धी संत हिला मिळाला होता. लहानपणापासून तिचे एनसीसी आणि देशासाठी काम करण्याचा स्वप्न होते, समृद्धीची ही कामगिरी महाराष्ट्रातील मराठी तरुणींसाठी अभिमानाची गोष्ट तर ठरलीच, शिवाय समृद्धीच्या रुपाने जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. म्हणून समृद्धीचे जळगावातील विविध सामाजिक संस्था व संघटना, राजकीय पक्ष तसेच मित्र परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.