प्रतिनिधी , कोलापूर : कोल्हापूर लॉकडाऊन काळातील वीज बिल भरणार नाही. महावितरण’कडून सक्तीने वीज बिल वसुली सुरू झाल्यास जशाच तसे उत्तर देऊ, राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर सर्वसामान्य जनतेची वीज तोडून दाखवा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. आज इचलकरंजी येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने वीजबील वाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करावे, यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. वीजबिलात दरवाढ झाल्याने राज्यभरात सर्वसामान्य जनतेमध्ये राज्य सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. तीन महिने रोजगार बंद असल्याने लाईट बिल कुठून भरू? असा सवाल सर्वसामान्य जनतेने केला आहे. लॉकडाऊन काळातील बिल माफ व्हावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेने केली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने विज बिल माफी साठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, वीज तज्ञ प्रताप होगाडे आमदार प्रकाश आवाडे, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी येथील गांधी पुतळा चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन तो प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
