जनतेज न्युज

कोपरगाव नगरपालिका कार्यालयात तोडफोड करीत अधिकाऱ्यांना मारहाण

प्रतिनिधी , अहमदनगर : कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेच्या भिंतीलगत मोकळ्या जागेत असलेल्या बालाजी गोर्डे यांची लोखंडी पत्र्याची टपरी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून काल दि. २१ जुलै रोजी रात्री साडे अकरा वा. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढली होती . टपरी काढल्याच्या कारणावरून आज दि. २२ जुलै रोजी या संदर्भात नगरपालिकेत जाब विचारायला गेलेल्या शिवसेनेचे नगरसेवक योगेश बागुल, नगरसेवक कैलास जाधव आणि त्यांचे सहकारी व नगरपालिका अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला यावेळी त्यांनी संतप्त होऊन नगरपालिका कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
शहरातील व्यापारी धर्मशाळे जवळ पूनम टॉकीज समोरील परिसरात पत्र्याची टपरी टाकण्याचे काम सुरू होते .मात्र नगरपालिका प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी सदरचे टपरी टाकण्याचे काम थांबविण्यात आले होते. मात्र अचानक ही टपरी अतिक्रमीत जागेत पुन्हा उभारण्यात आली. याची माहिती पालिका प्रशासनाला कळताच रात्री ११ वाजेच्या सुमारास पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी त्यांच्या पथकासह जाऊन जेसीबीच्या साह्याने सदर टपरी काढून टाकली. यावेळी टपरी धारक तसेच पालिकेचे अधिकारी यांच्यात इतर टपऱ्या देखील अतिक्रमीत जागेत आहे त्या का काढल्या नाही ? माझी टपरी का काढली? कोणाच्या सांगण्यावरून काढली? असे म्हणत संबंधितांनी वाद घातला होता. आज २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास याच विषयावरून संतप्त शिवसेनेचे नगरसेवक योगेश बागुल,नगरसेवक कैलास जाधव, सनी वाघ टपरी धारक बालाजी गोर्डे अन्य कार्यकर्ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी नगरपालिकेत आले होते. या दरम्यान टपरी धारक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी संतप्त जमावाने अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली . तसेच पालिकेच्या बांधकाम विभागातील टेबल खुर्ची संगणक इतर मालमत्तेची तोडफोड केली आहे.
याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये उपमुख्याधिकारी सुनील भाऊसाहेब गोर्डे वय. ४० . यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अढथळा आणणे, शासकीय अधिकाऱ्यास मारहाण करून शाहसकीय मालमत्तेचे नुकसान करणे आदी कारणावरून सनी रमेश वाघ, योगेश तुळशीदास बागुल, कैलास द्वारकानाथ जाधव , बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे ,निलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निकुंभ सर्व राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांच्यावर भा. द. वि. कलम ३५३, ३३२, १८९, ३२३,४२७, १२०( ब)१८८, २६९, २७०,१३४,१४७,१४९ ,तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि वासुदेव देसले यांच्या मार्गदशनाखाली पो. उप नि. बी सी नागरे करीत आहे.