प्रतिनिधी, कल्याण : करोना काळात वाढलेल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या ४४७ कर्मचार्यांची सेवा पालिका प्रशासनाने खंडित केली आहे. यानंतर बेकार झालेल्या या कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज या कर्मचार्यांनी पालिका मुख्यालयात धरणे आंदोलन करत न्यायाची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून या कर्मचार्याच्या करारा नुसार त्यांची सेवा खंडित करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून करोना काळात रुग्णसेवेसाठी रुग्णालये सुरु करतानाचा कंत्राटी पद्धतीने ४५५ कर्मचार्याची भरती करण्यात आली होती. या कर्मचार्यांनी मागील २ वर्षे रुग्णसेवा केली मात्र आता करोना रुग्ण कमी झाले असून एकही करोना रुग्ण उपचाराधीन नसल्याने तात्पुरती करोना रुग्णालये पालिका प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहेत. यामुळे आरोग्य विभागासाठी कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या कामगाराची सेवा खंडित करण्यात आली आहे. ४४७ पैकी काही कर्मचार्यांना मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कामावरून काढून टाकण्यात आले तर उर्वरित १३० कर्मचार्यांना ४ मे पासून कमी करण्यात आले आहे. दरम्यान आपला करोना योद्धा म्हणून सन्मान केल्यानंतर आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आल्याने आपल्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे कर्मचार्याचे म्हणणे आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात या कर्मचार्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने २७ जून पर्यत या कामगारांना सेवेत ठेऊन घेण्याचे निर्देश दिले आहेत मात्र तरीही आरोग्य विभागाचे अधिकारी आपल्याला कामावर हजर करून घेण्यास तयार नसल्याचे सांगत आज या १३० कामगारांनी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करत न्यायाची मागणी केली. दरम्यान याबाबत पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त अर्चना दिवे यांनी या कामगारांना करारानुसार कामावरून कमी करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले.
