जनतेज न्युज

लांज्यात मुचकुंदी नदीला पूर.

प्रतिनिधी , रत्नागिरी  : आज दिवसभर पावसाने लांजा तालुक्याला झोडपून काढले. विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर आंजणारी वरचा स्टॉप येथे मुंबई-गोवा महामार्गालगत ठेवण्यात आलेला मातीचा भराव पावसामुळे लगतच्या घर, दुकानात शिरून सामानाचे नुकसान झाले

आज सकाळपासून पावसाने संततधार लावली होती. तुफानी पावसाचा फटका हा आंजणारी येथील घरे व तीन दुकानांना बसला.‌ आंजणारी वरचा बस स्टॉप या ठिकाणी महामार्गाचे काम करताना मातीचा भराव महामार्गा लगतच ठेवण्यात आला होता. मात्र गटार नसल्याने सोमवारी कोसळलेल्या तुफानी पावसाने हा मातीचा भराव व पाणी महामार्गा लगतच असलेल्या किराणा, टेलर आणि भरुन अशा तीन दुकानांत  शिरले. तसेच एका घरात शिरले. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी शिरल्याने दुकानातील सामानाचे नुकसान झाले.

प्रचंड पावसामुळे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट विलवडे रस्त्यावरून वाहू लागल्याने तालुक्यातील महत्त्वाच्या विलवडे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी वाहू लागल्याने हा रस्ता काही काळासाठी ठप्प झाला होता त्यामुळे रिक्षा, दुचाकी यासारखी वाहने या ठिकाणी अडकून पडली होती.