प्रतिनिधी , कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजकारण करण्यासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी जन्माला आले आहेत. असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे तर पक्ष चालवण्यासाठी जन्माला आले आहेत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते त्यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी ही टीका केली आहे.
मुश्रीफ पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून वारंवार महा विकास आघाडी सरकारवर टीका करण्याचे काम सुरू आहे. त्यातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप कडून होत आहे. त्यांच्या टिकेमुळेच आम्ही तिघेजण घट्ट आहोत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो असा टोला देखील मंत्री मुश्रीफ यांनी लगावला. पुढे म्हणाले, राज्यपालांकडून संविधान रक्षणाची जबाबदारीत दिरंगाई होत आहे. तर भाजपकडून राज्यपालांकरवी राजकारण करणे हे खेदजनक आणि दुर्दैवी आहे. अशी खंतही मुश्रीफ यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीकडून बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला. चंद्रकांत पाटील यांनाच पराभव दिसू लागल्याने त्यांचे बाजूला फायरिंग सुरू झाल्याचे म्हटले आहे.
