प्रतिनिधी , मुंबई : महानगरपालिकेच्या ई विभाग प्रभाग क्र.209 चे स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष यांच्या प्रभागात लघुत्तम निविदाकार मे. यश कॉर्पोरेशन यांच्या कंपनीला ई निविदेअंतर्गत 14 कामे मिळालेली असता स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव यांनी स्वत:च्या भ्रमणध्वनीवरुन कॉल करुन ‘सदर काम तु मागे घे’ अशा प्रकारची धमकी दिली. सदर कंत्राटदाराने याची लेखी तक्रार मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबईचे पोलिस आयुक्त यांना केलेली आहे. सदर तक्रारीत माझ्या जिवितास काही इजा किंवा धोका उत्पन्न झाला तर त्यास सर्वस्वी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे जबाबदार राहतील अशा प्रकारचा उल्लेख असलेली तक्रार सर्व संबंधितांना स्वत:च्या स्वाक्षरीत दिलेली आहे. सदर प्रकरणी ई निविदा अंतर्गत काम लागलेल्या निविदाकाराला काम मागे घेण्यास धमकावणे, या ठिकाणी काम कसे भरले ? हा प्रभाग कोणाचा आहे हे तुला माहित आहे का ? अशी विचारणा करणे, तसेच त्याचसोबत लघुत्तम निविदाकारावर दबाव आणून त्याला कार्यादेश व चलन न देण्यासाठी अधिका-यांवर दबाव आणणे हा प्रकार मुंबई महानगरपालिकेचे कामकाज सत्ताधारी कशा प्रकारे मनमर्जी कारभार चालवत आहेत व भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत याचे उत्तम उदाहरण आहे. या संदर्भातील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या व कंत्राटदारासोबतच्या संभाषणाची ध्वनिफीत उपलब्ध आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याबाबतची कबुली देखील दिलेली आहे. तसेच कंत्राटदाराची चित्रध्वनीफितही उपलब्ध आहे.
वरील सर्व प्रकार हा मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाला काळीमा फासणारा आहे. आणि म्हणूनच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याची नैतिक जबाबदारी स्विकारुन स्थायी समिती अध्यक्ष पदाचा तातडीने राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
