प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यात यंदा सहकारी आणि खासगी अशा 12 कारखान्यांची धुराडी पेटलेली आहे… दिवाळीनंतर अधिकाधिक गाळप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत… परंतु बऱ्याच कारखान्यांना मजुरांची टंचाई भेडसावत आहे… तीन आठवड्यांच्या कालावधीत साडे चौदा लाख टन उसाचे गाळप करून 14 लाख 70 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे… तर सरासरी उतारा 10.17 इतका आहे…
जिल्ह्यात यंदा सहकारी व खासगी अशा 15 साखर कारखान्यांना गाळप परवाना
मिळाला होता… परंतु प्रत्यक्षात 12 साखर कारखानेच सुरू झाले आहेत… परवाना
मिळालेले तासगाव, डफळे कारखाना जत आणि यशवंत कारखाना नागेवाडी या तीन
कारखान्यांत अद्याप गाळप सुरू नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते… तर
महांकाली, माणगंगा आणि केन ऍग्रो हे कारखाने यंदा बंदच आहेत… त्यामुळे
बारा कारखानेच हंगाम सुरू ठेवतील असे चित्र दिसून येते…
गतवर्षीच्या हंगामात शेवटी कोरोनाच्या संकटामुळे कारखान्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या… बरेच ऊसतोड मजूर जिल्ह्यात काही दिवस अडकून पडले… कारखान्यांना त्यांची राहणे व जेवणाची व्यवस्था करावी लागली… त्यानंतर त्यांना सुखरूप सोडावे लागले… या मजुरांनी कोरोनाच्या संकटाचा अनुभव
घेतला… त्यानंतर कोरोनाची आपत्ती कायम असताना कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे… कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक कारखान्याकडे मजूर यंदा कमी प्रमाणात आले आहेत… त्यामुळे ऊसतोडीसाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे… त्यामुळे कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे…मजुरांची कमतरता असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी जादा पैसे द्यावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे
येत आहेत… अशा सर्व परिस्थितीत कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. यंदा ऊस
मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु मजुरांची कमतरता लक्षात घेऊन हंगामाच्या शेवटी अधिकाधिक गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागेल..
