प्रतिनिधी , नागपूर : नागपूरच्या शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात शुक्रवारी एका महिलेला जाळण्यात आल्याच्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजवली आणि पोलीसांची सुद्धा धावपळ सुरु झाली. मात्र, हे प्रकरण किचकट असल्याचं पुढे आलं. मृत महिलेचं नाव शबाना असून ती ४० वर्षाची विवाहित आहे. ती एका ऑटोमोबाईलच्या दुकानात कामाला होती, शबानाची फेसबुकवरून एका व्यक्तीसोबत ओळख झाली नंतर प्रेम प्रकरण झालं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते, याचं उत्तर विचारण्यासाठी शबाना त्या प्रियकराच्या घरी गेली असता त्या ठिकाणी तिचा प्रियकर आणि शबाना असे दोघेच होते, दोघात नेमकं काय झालं? हे अजून स्पष्ट नाही. मात्र, त्या ठिकाणी शबानावर पेट्रोल टाकून ती जळाली. त्यानंतर तिच्या प्रियकराने तिला रुग्णालयात पोहचवीले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शबानाने मृत्यूपूर्वी पोलीसांना दिलेला जबाब आणि पोलिसांनी केलेली चौकशी यांच्यात मोठी तफावत दिसून आली. शबानाने स्वतः पेटवून घेतलं की तिच्या प्रियकराने तिला पेटवले हे अजून स्पष्ट होऊ शकलं नसल्याचं पोलीस विनिता साहू डीसीपी झोन 2 नागपूर पोलीस यांनी सांगितले.
