जनतेज न्युज

भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री

प्रतिनिधि , भंडारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयात दगावलेल्या बाळांच्या आईची भोजापूर इथं जात भेट घेतली. त्यावेळी आपण हात जोडून उभं राहण्यापलीकडे काही करु शकलो नाही, अशी खंतही ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

पीडित कुटुंबियांचं सांत्वन करुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “ही दुर्घटना आम्ही गांभीर्यानं घेतली आहे. मी, विधानसभा अध्यक्ष आणि मंत्री येथे आलो आहोत. पीडित कुटुंबासमोर हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडं पर्याय नव्हता. कोरोनाचा सामना करताना इतर गोष्टींकडे डोळेझाक केली गेली का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी केली जाईल. जे काही सत्य आहे ते बाहेर येईल या घटनेला जो जबाबदार असेल तो सुटणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

तसंच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विभागीय आयुक्तांना त्याबाबत आदेश दिले आहेत. मुंबईतून अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे त्यांचीही नेमणुक या टीममध्ये करण्यात आली आहे, कुठेही कसर राहणार नाही, सत्या पुढे येईल आणि त्यात जर कुणी जबाबदार आढळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या दुर्घटनेनंतर राज्यात पुन्हा अशी दु:खद घटना घडू नये यासाठी राज्यातील सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश दिल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.