जनतेज न्युज

सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लू चा शिरकाव ; मान मोडून कोंबड्या मारताना मालकाला अश्रू अनावर

प्रतिनिधी , सोलापुर : परभणी , लातूर नंतर आता सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लू ने शिरकाव केलाय. मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावात बर्ड फ्लूने कोंबड्या मृत्युमुखी पडल्या चे आता सिद्ध झालंय. गावासह परिसरातील एक किलोमीटर परिघातील शेकडो कोंबड्या आता नष्ट करण्यास सुरुवात केलीय. मात्र मान मोडून कोंबड्या मारताना पोल्ट्री मालकाला अश्रू अनावर झाले.

सतत कोंबड्या मरताहेत म्हणून पोल्ट्री मालकाने 11 जानेवारी रोजी शासनाच्या पशु विभागाला कळवले. त्यानंतर या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. तोपर्यंत जुनेद पोल्ट्री फार्ममध्ये शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या . अखेर या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचा अहवाल आल्यावर प्रशासनाने कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात केलीय. पशु विभागाची सात पथके गावात फिरून कोंबड्या नष्ट करताहेत.
मंगळवेढा तालुक्यात कुठेही परदेशी पक्षी येत नसताना बर्ड फ्लू आला कसा ? याचा शोध आता पशु विभाग घेत आहे.
सर्व परिस्थिती वर मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदय भोसले हे लक्ष ठेवून आहेत.

कोरोनामुळे डबघाईला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाला आता कुठे चांगले दिवस आले असतानाच बर्ड फ्लूने पोल्ट्री व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. आपल्या डोळ्यासमोर कोंबड्यांची मान मोडून त्यांना मारताना पोल्ट्री मालकाला अश्रू अनावर झालेत.
गावात एक मोठा खड्डा करून या नष्ट केलेल्या कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने पुरण्यात येणार आहेत.