जनतेज न्युज

आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू ; हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

प्रतिनिधी, नंदुरबार : बलात्कार करून मुलीची हत्या होऊनही पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्याचा आरोप करीत तिच्या नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो ४३ दिवसांपासून मिठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला आहे. ही घटना नंदुरबार जिल्हातील धडगाव तालुक्यातील असून पीडित कुटुंब आदिवासी आहे. आदिवासी मंत्र्यांच्या जिल्हात घटना घडल्या मुळे मुलीला न्याय मिळेल या आशेवर परिवार बसला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील पीडित विवाहिता माहेरी असताना १ ऑगस्टला ही घटना घडली. धडगाव तालुक्यातील वावी गावातील तिच्या परिचयाच्या लोकांनी तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून गावाबाहेर नेले. काही वेळाने पीडितेने नातलगांशी मोबाइलवर संपर्क साधून ओढवलेली परिस्थिती कथन केली. रणजितसह चार जण आपल्यावर अत्याचार करीत असून ते ठार मारतील, अशी भीती तिने फोनवर व्यक्त केली. त्यानंतर काही वेळेतच वावी येथील आंब्याच्या झाडाला तिने गळफास घेतल्याचे तिच्या कुटुंबियांना कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह झाडावरून उतरवून पुरावा नष्ट करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार करूनही पोलिसांनी त्या दिशेने तपास केला नाही. पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर आजपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार केलेले नाहीत. पुन्हा शवविच्छेदन होईल, या आशेवर तिचे पार्थिव मिठाच्या खड्डय़ात ठेवले आहे असे नातेवाईकानी सांगितले.
शवविच्छेदनावेळी पोलिसांनी आत्महत्येच्या अनुषंगाने विच्छेदन करण्यास सांगितले होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे पोलिसांनी सांगितले नाही, त्यामुळे तसे विच्छेदन झाले नसल्याचे धडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची ध्वनिफीत कुटुंबियांकडून सादर करण्यात आली आहे. पीडितेचे मृत्यूपूर्वीचे मोबाईल संभाषण, आपल्यावर अत्याचार केले जात असल्याबाबत तिने व्यक्त केलेली अगतिकता या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आजही पीडितेचे कुटुंब न्याय मिळेल, या आशेवर मिठाच्या खड्डय़ात ठेवलेल्या पार्थिवाजवळ आस लावून बसले आहे. या प्रकरणात आतापर्यंत रणजित ठाकरे , सुनील वळवी ,अमर वळवी या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहिती शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी दिली. तपासातून जे तथ्य समोर आले, त्यानुसार अतिरिक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करण्याची सूचना अधीक्षकांनी धडगाव पोलीस ठाण्यास केली आहे.