प्रतिनिधी, बुलडाणा : पशुपालन शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर सध्या लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले आहे. लम्पी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. लम्पी’ या जनावरांमधील त्वचेच्या साथीच्या रोगाचा शिरकाव तालुक्यात झाला असल्याने शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी घरगुती उपाययोजनांबरोबरच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यासह खामगांव तालुक्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.तालुक्यात जवळपास 25 ते 30 जनावरांना या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. जनावरांच्या अंगावर गाठी, ताप येणे, डोळ्यातून व नाकातून चिकट द्रव येणे, चारा खाणे कमी होणे, पाणी पिणे कमी होत होत बंद होते. पायावर सूज येऊन लकवा येणे यासारखी लक्षणे दिसत आहेत. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष झाले तर जनावरे दगावण्याची भीती अधिक आहे. यासाठी शेतकरी वर्गाला घरगुती व नैसर्गिक उपचारपद्धतीवर भर देणे गरजेचे आहे. तर आज पर्यंत जवळपास 3 हजार 500 जनावरांना लसीकरण करण्यात आले तसेच जनावरे बांधण्याच्या ठिकाणची जागा स्वच्छ ठेवून डास, माश्या होणार नाहीत, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे.
