प्रतिनिधी, अमरावती : अनाथ , बेघर , अपंग व पारधी समाजातील मुले सिग्नल , रेल्वे स्टेशन , बस स्टँड इत्यादी ठिकाणी भीक मागतात, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे मतीन भोसले यांनी प्रश्नचिन्ह आदीवासी आश्रम शाळा सुरू केली. या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरून विद्यार्थ्यांना एकत्र करून पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांसाठी राहण्याच्या सुविधेसाठी वस्तीगृहाचे बांधकाम करायचे असून त्यासाठी सहा कोटी रुपयांची गरज असल्याने संस्थेचे अध्यक्ष , शिक्षक , विद्यार्थीनी आज पासून मदतीची झोळी या अभियानाला सुरुवात गुरुकुंज मोझरी येथून केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी अमरावती शहरातील विविध भागात फिरून नागरिकांना मदत मागितली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी उपक्रम राबवून नागरिकांना मदतीचे आवाहन करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी सांगितले.
