प्रतिनिधी, औरंगाबाद : महाराष्ट्रावर औरंगजेबाने आक्रमण केले यावेळी अनेक मंदिरांचा प्रार्थना स्थळांची मोडतोड सुरू झाली. यामध्ये पंढरपूरच्या मंदिराला आणि विठ्ठल मूर्तीला धोका पोहोचू नये यासाठी विठ्ठलाची मूर्ती तब्बल चार वर्षे मंदिरात नव्हे तर पंढरपूर नजीक असणाऱ्या पाटलांच्या वाड्यात बडव्यानी ठेवली. या घटनेला 323वर्षे झाली. हाच दिवस पंढरपूर येथे विठ्ठल मूर्ती संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. पंढरपुरचे विठ्ठल मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी व सर्व मराठी माणसाचे आराध्य दैवत. अशाच आराध्य स्थळाची तोडफोड करण्याचा मनसोबा घेऊन औरंगजेबाने पंढरपूरजवळ आपली आक्रमणे सुरू केली. या काळात पंढरपूर पासून जवळ असणाऱ्या देगावच्या सूर्याची पाटील यांच्याकडे बडवे समाजातील संत प्रल्हाद महाराज बडवे यांनी विठ्ठलाची मूर्ती सन 1695 साली संवर्धनासाठी दिली. ही मूर्ती देगाव येथे सुमारे 4वर्षे होती. याकाळात विठ्ठलाची मूर्ती सूर्याजी पाटील यांनी स्वतःच्या वाड्यातील तळघरात तर शेतातील विहीरीमध्ये ठेवली. यानंतर 1699च्या श्रावण महिन्यात ही मूर्ती परत पंढरपूरच्या मंदिरात आणण्यात आली. ह्याच घटनेच्या स्मृती जागवण्यासाठी सूर्याजी पाटील यांचे 13 वे वंशज अभिजीत पाटील आणि संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज आशुतोश बडवे व वारकारी सांप्रदायाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये पंढरपूरच्या संत नामदेव पायरी येथून पांडूरंगाच्या पादुका देगाव येथे आणण्यात येतात. यानंतर पाटील यांच्या वाड्यात आणि विहीरीमध्ये विधीवात पूजा करुन हा उत्सव साजरा होतो.
