प्रतिनिधी, सांगली : सांगलीच्या संकेत सरगरने बरमिंगम राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये सिल्व्हर मेडल मिळवलं आहे. संकेतच्या कामगिरीनंतर सांगलीमध्ये जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत आणि दुखापतग्रस्त असताना सुद्धा संकेत सरकारने सिल्वर मेडल मिळवत मौल्यवान कामगिरी केली आहे. तर दोन महिन्या पूर्वी हरियाणा मधील पंचकुला येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील वेटलिफ्टिंगमध्ये संकेतची लहान बहीण काजल सरगरने महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. संकेत आणि काजल या बहिण भावांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून मोठी कामगिरी केली आहे.सांगलीच्या संजयनगर मधील महादेव आनंदा सरगर आणि त्यांची पत्नी सौ. राजश्री महादेव सरगर यांची चहा आणि भाजीचा गाडा आहे. मात्र प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात यशस्वी खेळाडू बनवले आहे. सरगर यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. त्यापैकी काजल आणि संकेत हे दोघेही वेटलिफ्टर आहेत. तर दुसरा मुलगा जीवन हा सध्या शिक्षण घेत आहे.
