प्रतिनिधी , सोलापूर : सोलापुरातील माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिरातील गणपती मूर्तीच्या आजूबाजूस एका भाविकाने स्वखर्चाने लावलेल्या स्टाईल फरशीची गणेश चतुर्थीदिवशीच पुरातत्त्व खात्याने तोडफोड करून उखडून टाकली आहे.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. मंदिर परिसरातील भिंतीची डागडुजी करणे गरजेचे आहे. ब्रह्मपुरी, माचणूरसह पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. सिद्धेश्वर मंदिरातील गणपती मूर्तीशेजारी ओबडधोबड असल्याने एका भाविकाने सुंदर स्टाइल फरशी केली होती. मात्र, याबाबत पुजारी व भाविकाला फरशी काढून टाकण्याची नोटीस दिली. गणेश चतुर्थीदिवशी त्या मंदिरातील मूर्तीच्या आजूबाजूला लावलेली फरशी पुरातत्व खात्याकडून काढण्यात आले. आमच्या परवानगीशिवाय कोणी काही करायचे नाही, ही भूमिका घेणाऱ्या पुरातत्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.
