जनतेज न्युज

छंद जोपासून वृत्तपत्र वाटपकर्ता बनला मूर्तिकार; पर्यावरण पूरक गणेश स्थापनेचा देतोय संदेश

प्रतिनिधी, यवतमाळ : शहरात गणेशोत्सवाची लगबग सूरू झाली आहे, मूर्तिकार मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अशास्थितीत यवतमाळ येथिल विश्वशांती नगरात वास्तव्यास असलेला नवोदीत मुर्तीकार भल्या पहाटे घरोघरी वृत्तपत्रे वाटप करून मुर्ती घडविण्याचा छंद जोपासत आहे. शासनाच्या नियमांचे उलंघन न करता केवळ लाला मातीच्या पर्यावरण पुरक गणेशमूर्ती साकारून नैसर्गिक संवर्धनाचा सामाजिक संदेशही तो देत आहेत.लखन सोनुले असे नवोदित मुर्तीकाराचे नाव आहे. तो शहरातील विश्वशांती नगर येथे राहतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. लखन व त्याचा भाऊ चेतनने लहान वयातच वृत्तपत्र वाटप करणे सुरू केले. यापैशातून लखन शैक्षणिक गरजा पूर्ण करीत गेला. वृत्तपत्र वाटप करीत असतानाच एके दिवशी गणेश मूर्ती घडवताना काही मूर्तीकार त्याच्या दृष्टीस पडले. बाल वयातच कलेची आवड असल्याने हळूहळू मूर्तीकरांसोबत ओळख निर्माण केली. त्यामुळे गणेश उत्सव आला की मूर्तिकारांकडे जाऊन मातीचा खेळ करणे, व मुर्तीकांराना वाटले ती मदत करने हे एकच काम तो करीत गेला. खेळता खेळता आपण त्या लाल मातीच्या प्रेमात पडलो हे लखनला माहीत नव्हते. अशा स्थितीत त्या मूर्तीकारांसोबत मूर्ती घडवताना लखनाच्या मुर्त्यांनी केव्हा पुर्ण आकार घेतला. हे त्याला देखील कळले नाही. गेल्या 9 वर्षांपासून लखन वृत्तपत्रे वाटण्याचे काम करत आहेत. यासोबतच गेली 5 वर्षापासून लखन पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करत आहे. या कामात लखनचा लहान भाऊ चेतन याचीही साथ आहे.