जनतेज न्युज

चोरीच्या २१ लाखांच्या ६४ मोटारसायकली जप्त

प्रतिनिधी, सोलापूर : पंढरपूर शहर गुन्हा प्रकटीकरण शाखेकडून आठ आरोपींकडून २१ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ६४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकली सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, बीड, पंढरपूर या शहरातून चोरण्यात आल्या आहेत. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टाकळी रोड बायपास येथे एक इसम चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून येथील एका आरोपीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता यातील संशयित आरोपी विशाल रजपुत (रा. टाकळी बायपास) याच्याकडून माहिती मिळाली. 
 
त्यांनी अन्य ६ ते ७ साथीदारांकडून सांगली, कोल्हापूर, बीड, सातारा, पंढरपूर या शहरामधून मोटारसायकली चोरल्या असल्याचे सांगितले. प्रशांत भोसले (रा. लोटेवाडी), आकाश खिलारे (पंढरपूर), वैभव लवटे (लवटेवाडी), लक्ष्मण पडळकर (लवटेवाडी), संकेत शिंदे (भाळवणी), दीपक हाके (कटफळ), ज्ञानेश्वर शेळके (कटफळ, सांगोला) यांच्याकडून २१ लाख रुपयांच्या ६४ मोटारसायकली जप्त केल्या आहे. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते व हिंम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या सुचनेनुसार धडाकेबाज पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी नियुक्त केलेल्या पथकाने ही कामगिरी केली आहे.