जनतेज न्युज

दाम दुप्पटचा हव्यास सोलापूरकरांना नडला, पुन्हा एकदा सोलापूरकर पडले अमिषाला बळी

प्रतिनिधी, सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता म्हणून कुप्रसिद्धीस आलेला विशाल फटे याने सोलापुराकारांना या अगोदरच लाखोंना गंडवलं आहे.
ही घटना ताजी तवानी असतानाच सोलापुरातील अनेक नामांकित व्यक्ती पैसे दामदुप्पट योजनेला पुन्हा एकदा बळी पडले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक सोलापूरकर डॉलर दामदुप्पट योजनेत पैसे गुंतवणूक करत होता. या दामदुप्पट डॉलर योजनांना बळी पडून सोलापूरकरांना चांगलाच चुना लावण्यात आला आहे. ‘सीसीएच’ (क्लाऊड मायनर अॅप) या अमेरिकन अॅपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. पण चार दिवसांपासून सीसीएच अॅपवर डॉलर्स काढून घेण्याची सुविधा बंद झाली. तसेच मॅक्स क्रिप्टो या अॅपमधून डॉलर काढणे दहा दिवसांपासून अचानकपणे बंद झाले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, पोलीस, वकील, इंजिनिअर आदी लोकांचे जवळपास एक हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुंतवणूक केलेल्या हजारो सोलापूरकरांना यामुळे जबरदस्त धक्का बसला आहे. सीसीएच, मॅक्स क्रिप्टो इतर अॅपमध्येही बहुसंख्य श्रीमंतांनी आयुष्यभराच्या कमाईची गुंतवणूक केली होती.