प्रतिनिधी, नांदेड : ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांना संपवण्याचा कट करत आहेत अशा प्रखर शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी कारवायांचा आणि भाजपाच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध केला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना ईडी कडून अटक करण्यात आल्यानंतर आज दुपारी नांदेडमध्ये विरोधात शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.केंद्र सरकार विरोधात देशातील जनतेचा असंतोष उफाळून येऊ नये , शिवाय विरोधी पक्ष भक्कमपणे उभा राहू नये यासाठी देशातील विरोधी पक्ष संपवून टाकण्याचा घाट भारतीय जनता पार्टीने घातला आहे . महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार भक्कमपणे चालत असताना केवळ भाजपाचा भांडाफोड होईल आणि मोदी सरकार विरोधात महाराष्ट्रात लाट तयार होऊन देशात परिवर्तन होईल अशी भीती भारतीय जनता पार्टीला वाटत होती . त्यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनाही याचप्रमाणे अटक करण्यात आली आहे. देशात भाजपा विरोधी वातावरण तयार होत असल्याने त्या वातावरणावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी आणि आपल्या विरोधात सत्य बोलणाऱ्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून केंद्रीय तपास यंत्रणांचा ईडीचा दुरुपयोग केला जात आहे . सत्तेतील एकाही नेत्या विरुद्ध ईडीची कारवाई होत नसल्याने ईडीच्या या धोरणाविरुद्धही जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी सडकून टीका केली. सत्तेत सहभागी व्हा आणि पवित्र व्हा असा दंडक भाजपाकडून लादला जात आहे. अनेक नेत्यांना ईडीची धमकी दाखवून त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले जात आहे. भाजपाची ही हुकूमशाही फार काळ चालणारी नसून देशातील जनता भाजपाचा हा खरा चेहरा समाजासमोर येईल आणि त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल असेही कोकाटे म्हणाले. शिवसेनेची नेते संजय राऊत हे प्रत्येक वेळी भाजप विरोधी बोलत होते. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणत होते. त्यामुळेच खा. संजय राऊत यांना खोटे कागदपत्र तयार करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केला आहे .यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
