प्रतिनिधी, जालना : हृदयाशी संबंधित विविध तपासण्यांसाठी जालन्यात कार्डियाक कॅथलॅब मंजूर झाली असून जिल्हा रुग्णालय परिसरात ४ हजार स्क्वेअर फूट जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे. ही लॅब झाल्यास हृदयरोग रुग्णांवर तज्ज्ञांमार्फत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीची सुविधा जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध होणार आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिल्या टप्प्यात राज्यातील जालना, नांदेड, बारामती व गडचिरोली या चार ठिकाणी कॅथलॅब मंजूर केल्या असून दुसऱ्या टप्प्यातही २० लॅबचा समावेश आहे. सर्वसामान्यांना हृदयाशी संबंधित सर्व तपासण्या व उपचार मोफत स्वरूपात उपलब्ध व्हावेत यासाठी कॅथलॅब उभारणीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. चारही लॅबसाठी ३२ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर असून बांधकामासाठी ६ कोटी, तर या ठिकाणी लागणारी यंत्रे, साहित्य व इतर खरेदीसाठी २६ कोटी २३ लाख रुपयांचा निधी आहे. दरम्यान, कॅथलॅब उभारणीसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना ९ एप्रिल २०२२ रोजी आयोजित गांधी चमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या माता व बालसंगोपन केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी माजी मंत्री टोपे यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या होत्या.
