प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण स्थानकाजवळ रेल्वे रुळाला सकाळी ६.३५ वाजता तडा गेला होता.रेल्वे प्रशासनाने हा तडा तातडीने दुरुस्त केला.या सगळ्यामुळे मात्र मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या जवळजवळ १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी पहायला मिळते आहे.कल्याण स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.लोकल स्थानकात उशिरा येत असल्याने कामाला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणखी वाढतच आहे. विशेष म्हणजे लोकल स्थानकात यायला उशीर का होतो याची प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांच्या गोंधळात अधिकच भर पडून रेल्वे प्रशासना बाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते. मात्र सकाळच्या वेळेस कामाला जाण्याची घाई असताना लोकलचा हा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले.
