प्रतिनिधी, यवतमाळ : विदर्भ – मराठवाडयाच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीला सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. सध्यस्थितीत गांजेगावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे कालपासून विदर्भ – मराठवाडयांचा संपर्क तुटून दळणवळन वहातुक ठप्प झाली आहे. तर नदीचे पाणी अनेकांच्या शेतात शिरल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी मधील पैनगंगा नदीवर असलेल्या गांजेगाव पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाणी येत असल्याने उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षपासून केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नदीकाठचे नागरिक करत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येते तर कयाधू नदीचा पुरही पैनगंगेत येऊन मिसळत आसल्यामुळे नदीला महापूर येतो. एव्हाना या पुराचे पाणी गावानजीक नाले, नदीकाठच्या हरजो हेक्टर शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अश्यावेळी विदर्भ – मराठवाड्याला जोडणारा गांजेगाव येथील पुलावरून पुराचे पाणी येऊन पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडत असतो. जोपर्यंत पुराचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत दळणवळणासाठी नागरिकांना ३० ते ३५ किमि. दूरचा प्रवास करून आपले गाव गाठावे लागते हे वास्तव आहे. या संदर्भात नांदेड न्यूज लाइव्हने गत १० वर्षापासून सतत बातम्याही प्रकाशित केल्या आहेत. जर हा पूल उंच करण्यात आला तर मराठवाड्यातून विदर्भात जाण्यासाठीचे अंतर या पुलामुळे कमी होऊन वारंवार मार्ग बंद होण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळणार आहे. मात्र याकडे आत्तापर्यंतच्या एकही खासदारांनी व पैनगंगा प्रकल्पच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने नदीकाठच्या गावकऱ्यासह विदर्भ – मराठवाड्यात कमी वेळात ये-जा करणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात संपर्क तुटण्याच्या समस्येचा सामान करावा लागतो आहे.
हा मार्ग म्हणजे विदर्भ- मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटकला जोडलेला आहे. हा रस्ता ये-जा करणाऱ्या धार्मिक दिंड्यां मार्गक्रमणाचा असून, तीर्थक्षेत्र माहूर, बासर, पोहरा देवी येथे भक्तांची आवक – जावक होते. तसेच विदर्भातील नागरिकांना अल्प खर्चातून रेल्वे प्रवास करण्यासाठी जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ राहत असल्याने या मार्गात अडसर ठरलेला पैनगंगा नदीवरील गांजेगावचा पुलाची उंची वाढऊन नव्याने बांधणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हा पूल कम बंधारा झाला तर वरील भागात पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना साठून राहणाऱ्या पाण्याचा देखील नक्कीच फायदा होणार आहे. पावसाळ्यात विदर्भ – मराठवाड्याचा संपर्क तुटण्याचे प्रकार थांबतील व दळणवळणातील अडथळे दूर होऊन, समोरील गावांना होणाऱ्या पुराचा धोका टळून गावकरी चिंतामुक्त होतील. दोन्ही विभागातील अनेक गावांना याचा फायदा होईल अशी रास्ता अपेक्षा या भागातील जनतेची आहे.
