जनतेज न्युज

पॅरेलाइज व्यक्तीला तब्बल दोन तास ठेवले प्रशासनाने दारात

प्रतिनिधी, बीड : प्रशासनातील अधिकारी किती निगरगट्ट झालेत. याचा प्रत्यय बीडच्या तहसील कार्यालयामध्ये आला. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी हयात आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी एका पॅरेलाइज लाभार्थ्याला कार्यालयात बोलून घेतले. संजय गांधी निराधार योजनेतून लाभार्थ्याला महिन्याला एक हजार रुपयांच मानधन मिळतं. मात्र ते मानधन मिळवण्यासाठी किती यातना सोसाव्या लागतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आसाराम आठवले हे तीन वर्षांपासून पॅरेलाइज आहेत. त्यांना संजय गांधी निराधार योजनेतून शासनाचे एक हजाराचे मानधन मिळतं. मात्र मागील वर्षभरापासून त्यांना हे मानधन मिळालेलं नाही. बीड तालुक्यातील पाटेगाव येथे आठवले पत्नी, मुलगा आणि सुनेबरोबर वास्तव्यास आहेत. कुटुंबाने त्यांचा हयातनामा प्रशासन दरबारी दिला असला तरी प्रशासनाने मात्र या अवस्थेत देखील त्यांना बोलावून घेतलं. तब्बल दोन तास त्यांना नायब तहसीलदार अरविंद काळे यांच्या कार्यालयाच्या दारात ठेवण्यात आलंय. हा प्रसंग पाहून अंगावर शहारे आणि प्रशासना विरोधात चीड आल्याशिवाय राहणार नाही. या अवस्थेत असताना देखील प्रशासनाला पाझर का फुटत नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. नायब तहसीलदारांनी हे सर्व प्रकरण बँकेवर ढकलत हात वर केले आहेत.